सामाजिक सर्वेक्षण
प्रा. अलोक पवार
१.१ सामाजिक सर्वेक्षण
विषयाचे उद्देश
१.
विद्यार्थ्यांना सर्वेक्षण म्हणजे नक्की काय हे समजते.
२.
सर्वेक्षण आणि संशोधन यातील फरक विद्यार्थांना समजतो.
३.
संशोधनाचे फायदे आणि तोटे लक्षात घेता येतात.
४.
समाजातील विविध पैलू विद्यार्थ्यांना समाजात जाऊन पाहता येतात.
१.२ सर्वेक्षणाचे
टप्पे
ज्या
विद्यार्थ्यांनी सामाजिक सर्वेक्षण हा विषय परीक्षा अर्ज भरताना निवडला आहे, त्या
विद्यार्थ्यांनी काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन सर्वेक्षण पूर्ण करावयाचे आहे
आणि अहवाल निर्मिती करावयाची आहे. हा अहवाल विद्यार्थ्याला स्व: हस्तलिखित किंवा
टाईप केलेला असा कोणत्याही एका पद्धतीने केलेला असा असावा. अहवालात खालील मुद्दे
असणे अतिशय महत्वाचे आहे.
(१) सुरवातीचे पान
(२) अनुक्रमणिका
(३) ऋणनिर्देश
(४) विषयाची ओळख
(५) सर्वेक्षणाचे उद्देश
(६) विश्लेषण
(७) निष्कर्ष व उपाययोजना
(८) परिशिष्ट
आता
आपण सामाजिक सर्वेक्षणातील वरील अधोरेखित केलेले मुद्दे कसे लिहावयाचे याकडे पाहू.
१.२.१ सुरवातीचे पान
सुरवातीच्या
पानावर महत्वाचा मुद्दा म्हणजेच आपण सर्वेक्षण करताना जो मुद्दा घेतला आहे तो
लिहिणे. सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी विषय निवडणे हे देखील महत्वाचे काम आहे. सर्वेक्षणाचा
विषय हा स्थानिक विषयावर आधारभूत असावा, विद्यार्थ्यांने जो विषय निवडेल त्यातून
त्याला सहज माहिती उपलब्ध होईल असाच विषय त्याने निवडला पाहिजे. माहिती
मिळविण्यासाठी अडचणी उपलब्ध होतील शक्यतो असे विषय टाळणे. दबाव निर्माण होणारे
विषय न घेतलेले बरे.
उदा.
(i) धनकवडी, पुणे या भागातील भागातील
रस्त्यांवरील दिवे वेळेवर न लागल्यामुळे नागरिकाच्या
समस्या
वरील
विषय घेतल्यास विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी पदपथ नसल्याने लोकांच्या गैरसोई
समजावून घेता येतील. त्यावर आपल्या मार्फत काही उपाययोजना सुचवता येतील.
संशोधनामध्ये माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण हा पर्याय नक्की कसा वापरला जातो
हे देखील समजावून घेता येईल.
मात्र
विषय जर खालील प्रकारचा असेल;
(ii) धनकवडी, पुणे या भागातील तीन
नगरसेवकांपैकी कोणता नगरसेवक उत्तम कार्य करतो आहे
हे जाणून घेणे.
तर
कदाचित असा विषय हा दबावनिर्माण करणारा, प्रश्न विचारताना संभ्रम निर्माण करणारा
असा होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
आपला विषय सोपा - सुटसुटीत आणि समाजातील विविध प्रश्नांना अनुसरून असा निवडावा.
पहिले / सुरवातीचे पान नमुना
श्री स्वराज एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे
"<सामाजिक सर्वेक्षणाचा विषय>"
<विद्यार्थ्याचे नाव>
<वर्ग>
मार्गदर्शकाचे नाव
<येथे मार्गदर्शकाचे नाव टाकणे>
<येथे मार्गदर्शकाचे पद व शिक्षण टाकणे>
शैक्षणिक वर्ष २०
- २०
१.२.२ अनुक्रमणिका
अनुक्रमणिका
ही आपण एकंदरीत अहवाल लिहिताने जे मुद्दे लक्षात घेतले आहेत, त्याला अनुसरून तयार
करणे अपेक्षित आहे. अहवालाच्या प्रत्येक पानावर पान क्रमांक देऊन तो क्रमांक
अनुक्रमणिकेतील मुद्द्यासमोर असणे गरजेचे आहे.
१.२.३ ऋणनिर्देश
आपल्याला
हा सर्वेक्षण अहवाल लिहिताना बऱ्याच जणांनी मदत केली असेल, ज्यामध्ये तुमचे
शिक्षक, तुम्ही काही मित्रांची फोटो काढण्यासाठी, किंवा अनुमान कसे लिहावयाचे हे
समजावून घेणे, किंवा अगदी परिवारातल्या काही सदस्यांनी देखील तुम्हाला मार्गदर्शन
केले असेल तर त्यांचे आभार मानण्याचे हे पान. त्यांनी कशाप्रकारे मदत केली हे
सांगून हे इत्यंभूत सांगून त्याप्रकारे त्यांना ऋणनिर्देश देणे हे अत्यंत महत्वाचे
आहे.
१.२.४ विषयाची
ओळख
आपण
जो विषय निवडला आहे त्याची इत्यंभूत माहिती या भागात देणे आवश्यक आहे. सर्वेक्षण
विषयाचे नाव तयार करताना काही ठराविक शब्द आले असतील तर त्यातील प्रत्येक शब्दाचे
महत्व येथे पटवून देता आले पाहिजे.
उदा.
(iii)
मार्केटयार्ड, पुणे परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या
मुलांच्या अडचणी समजावून घेणे.
आता
वरील उदाहरणामध्ये कोणकोणते महत्वाचे शब्द आहेत ते प्रथम समजावून घेणे अत्यंत
आवश्यक आहे.
विषयाची ओळख
मार्केटयार्ड, पुणे : सर्वेक्षण नक्की कोणत्या भागातील आहे,
हा भाग कोणत्या दृष्टीकोनातून महत्वाचा आहे. त्याचा जगाच्या नकाशावरील नक्की स्थान
काय आहे. त्या स्थानाचे प्रमुख भूभागावरील महत्व नक्की काय आहे. या सर्व गोष्टी
ओळख करून देणे येथे गरजेचे आहे. उदाहरणामध्ये :
मार्केटयार्ड हा परिसर पुण्याच्या बाजारपेठेच्या
दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. पुण्याजवळील आणि पुण्याबाहेरील देखील
बऱ्याच शेतकऱ्यांच्या कडून येथे शेतमाल आणला जातो, आणि त्याची येथे विक्री होत
असते. रोज साधारण लाखो लोकांची ज्यामध्ये ग्राहक, विक्रेते, हमाल, आडते, व्यापारी,
वाहतूकदार यांची या ठिकाणी वर्दळ बघायला मिळते. या ठिकाणी फुले, फळे, भाज्या आणि
किराणा असे वेगवेगळे विभाग देखील पहावयास मिळतात. पुण्यामधील अन्य भागातील
विक्रेते या ठिकाणचा माल विकत घेऊन आपले दुकान चालवतात.
मार्केटयार्ड हा नव्याने वसविलेली बाजारपेठ आहे. आधी हा
संपूर्ण भाग महात्मा फुले मंडई येथे एकत्रित होता. मात्र फुले, फळे आणि भाज्या
यांच्या विक्रीसाठी १९८० मध्ये त्याकाळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या
नेतृत्वाखाली बुधवार पेठेतून हा भाग सध्याच्या गुलटेकडी येथे हलविण्यात आला.
बाजारपेठेचे नाव : मार्केटयार्ड, पुणे
नियमन :
संचालक मंडळाची निवड महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९४९ आणि नियम १९४९[१] मधील तरतुदींनुसार केली जाते, ज्यामध्ये बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि सचिव असतात.
वाहतुकीच्या सोई :
पीएमपीएमएल बसेस मार्केट यार्डला
शहरातील विविध भागांशी जोडतात. मार्केट यार्ड हे पुण्यातील
एक महत्त्वाचे बस डेपो आहे. या भागात
माल वाहतुकीसाठी ट्रक आणि टेम्पोचा वापर केला जातो.
सोई :
1. शेतमालाच्या विक्रीसाठी भूखंड
2. पाणी, वीज, सार्वजनिक विश्रामगृहे
3.
पेट्रोल पंप
4.
वजनमाप 3 - 5 टन
5. महाराष्ट्रातील सर्व बाजार
सोसायट्यांमधील सर्व कृषी मालाच्या थेट बाजारभाव
6.
शेतकरी अतिथीगृह.
7.
तक्रार केंद्र
8.
पर्यायी जमिनीची तरतूद व शेतीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास
9.
मोफत प्रथमोपचार केंद्र
व्यावसायिक महत्त्व :
पुण्यातील मार्केट यार्ड हे धान्य आणि
इतर किराणा वस्तूंच्या घाऊक विक्रेते आणि किरकोळ
विक्रेत्यांसाठी प्रसिद्ध व्यावसायिक ठिकाण
आहे. 1000+ पेक्षा जास्त व्यवसायांचे घर हे शहराच्या दक्षिणेकडील
शेपटीत 10 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.
अक्षांश व रेखांश : 18.4877° N, 73.8684° E
मार्केटयार्डचे व्यावसायिक महत्व बघता येथे बरेच लोक आपली
रोजीरोटी प्राप्त करण्यासाठी पुण्यात याठिकाणीच स्थायिक होतात. यांमध्ये बहुतांशी
लोक अगदी पदपथावरदेखील आपली निवासाची सोय करून राहताना दिसतात. हे सर्व लोक अगदी
याठिकाणी सहकुटुंब राहताना दिसतात. कुटुंबामधील बरेच लोक रस्तावरील कामे
करण्याशिवाय काही लोक हार बनविणे, लिंबू - मिरची विकणे अशी देखील कामे करतात.
मात्र कुटुंबातील लहान मुलांची याठिकाणी वाताहत होताना दिसते. त्यामध्ये काही मुले
अगदी रस्त्यावर सिग्नल ला उभे राहून भिक मागताना देखील दिसतात. पोटाचा प्रश्न
अत्यंत महत्वाचा असल्याने शिक्षणापेक्षा भिक मागून काही उपजीविका करता येते का हा
प्रमुख प्रश्न ही मुले हाताळताना दिसतात. तरीदेखील पुण्यासारख्या ठिकाणी ज्याला
शिक्षणाचे माहेरघर म्हणले जाते किंवा ज्या पुण्यामध्ये महात्मा फुले - सावित्रीबाई
फुले यांच्यासारख्या थोर मंडळींनी शिक्षणासाठी पुढाकार घेतला तेथे या मुलांना
शिक्षणासाठी नक्की कोणत्या अडचणी येतात हे समजावून घेण्यासाठी हे सर्वेक्षणाचे
प्रयोजन.
१.२.५ सर्वेक्षणाचे
उद्देश
सर्वेक्षणाचा
उद्देश हा सुस्पष्ट आणि सोप्या भाषेतील असावा. त्याला अनुसरून संपूर्ण सर्वेक्षण
चालू राहते. त्यामुळे सर्वेक्षणातील मुख्य उद्देश मांडणी करणे दे देखील तितकेच
महत्वाचे काम आहे. उद्देश किमान तीन ते चार असणे तरी योग्य ठरते असे म्हणावयास
हरकत नाही. या उद्देशाला अनुसरूनच सर्वेक्षणातील प्रश्नावली तयार होणार आहे हे
सर्वेक्षणकर्त्या विद्यार्थ्याने लक्षात घ्यावयाचे आहे.
उदाहरण
(iii) ला अनुसरून खालील उद्देश मांडणी केली आहे.
१. मार्केटयार्ड,
पुणे भागात रस्त्यावर निवास करणाऱ्या मुलांचे प्रश्न आकलन करणे.
२. शिक्षण
व रोजगार यामध्ये आर्थिक बाजू बघता प्राधान्य कोणत्या गोष्टींना दिले जाते याचे आकलन करणे.
३. मार्केटयार्ड,
पुणे परिसरातील शिक्षणाच्या सोईंविषयी माहिती मिळवणे.
४. मार्केटयार्ड,
पुणे परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्याचे शालेय समायोजन कसे होईल या दृष्टीने
उपाययोजना करणे.
आपण
जेंव्हा सर्वेक्षण करतो, तेंव्हा प्रत्येकाने हे लक्षात घेतले पाहिजे सर्वेक्षण हा
संशोधनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण संपूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या
झाले पाहिजे. संशोधनाच्या उद्देशांची पूर्तता ही संपूर्णपणे माहितीच्या आधारावर
अवलंबून असते. माहिती गोळा करण्याच्या प्रकारांमध्ये निरीक्षण, प्रश्नावली,
मुलाखत, अनुसूची, प्रयोग आणि सर्वेक्षण या सर्वांचा समावेश होतो. सर्वेक्षणाचे
महत्व म्हणजे यामध्ये निरीक्षण, मुलाखत व प्रश्नावली या तिन्ही गोष्टींचा समावेश
होतो. सर्वेक्षण करताना आपल्याला नक्की काय माहिती गोळा करावयाची आहे यासाठी
प्रश्नावली तयार करावी लागते. ही प्रश्नावली उद्देशांवर आधारभूत असते. प्रत्येक
उद्देशानुरूप निदान प्रश्न तयार करणे हे फार महत्वाचे आहे. मात्र प्रश्न हे साधारण
१५ ते २५ इतकेच मर्यादित असणे गरजेचे आहे. त्यापेक्षा जास्त प्रश्न असल्याने
उत्तरे देण्याऱ्या व्यक्तीला कंटाळा येऊन तो टाळाटाळ देखील करू शकतो.
उदाहरण
(iii) ला अनुसरून प्रश्ननिर्मिती :
असे वरील प्रमाणे उद्देश आणि प्रश्नावलीचे झाड आपल्याला तयार करायचे आहे, हे झाड तयार होताना त्याचे बीज आपण निवडलेला सर्वेक्षणाचा विषय आहे हे लक्षात घ्यावयाचा आहे. या झाडाला जी फळे येणार आहेत ते आपल्या सर्वेक्षणाचे फलित असणार आहे हे देखील सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीने जाणले पाहिजे.
संपूर्ण
सर्वेक्षणामध्ये निदान १५ ते २५ प्रश्नांचा समावेश असावा. म्हणजे एका उद्देशाला
अनुसरून निदान ५ प्रश्न अपेक्षित आहेत. अतिशय कमी आणि अतिशय जास्त प्रश्न हे
सर्वेक्षणासाठी घटक ठरतात. कमी प्रश्नावरून सर्वेक्षणाचे उद्देश फलित होईल असे होत
नाही. अधिक प्रश्न असल्यास सर्वेक्षणास उत्तरे देणारा व्यक्ती कंटाळून जाऊ शकतो.
सर्वेक्षणाची
प्रश्नावली तयार करताना आपल्याला प्रश्नावली कशी तयार करावयाची हे देखील लक्षात
घ्यावयाचे आहे. प्रश्न दोन प्रकारचे असतात. (१) मुक्त प्रश्न आणि (२) बंदिस्त
प्रश्नावली.
जर
प्रश्नांना उत्तरांसाठी पर्याय दिले गेले असतील तर त्या प्रश्नांना बंदिस्त प्रश्न
म्हणतात, तर प्रश्नांची उत्तरे विचार करून त्याच्या उत्तर देण्याच्या पद्धतीने
दिले गेले तर त्या प्रश्नांना मुक्त प्रश्न म्हणतात.
उदा.
प्रश्न : आपल्या भागात नियमित पाणी येते का?
अ. हो ब.
नाही
वरील
प्रश्नाचे उत्तर समोरच्याकडून हो किंवा नाही इतकेच येणार आहे. अन्य विकल्प नाही.
त्यामुले अशा प्रश्नाला बंदिस्त प्रश्नावली म्हणतात.
प्रश्न : आपल्या भागातील कचऱ्याचा प्रश्न आपण कोणत्या
पद्धतीने हाताळता?
वरील
प्रश्नाला उत्तर देताना समोरचा व्यक्ती उत्तर आपापल्या पद्धतीने देईल. दोघांच्या
उत्तरात फरक देखील जाणवू शकतो. अशा प्रश्नाला मुक्त प्रश्नावली म्हणतात.
सर्वेक्षण
करताना सर्वेक्षण करताना प्रश्न विचारायचे आहेत आणि समोरच्याच्या तोंडावरील भाव
देखील टिपायचे आहेत.
१.२.६ विश्लेषण
विश्लेषण
करताना काही ठळक मुद्दे देखील आपण लक्षात घ्यावयाचे आहेत. विश्लेषणावरून
उद्देशांची पूर्तता होत असते. आपण सुरवातीला जे उद्देश निर्माण केलेले आहेत, व
त्यानुसारच आपण आपले प्रश्न देखील निर्माण केले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी
प्रश्नाचे विश्लेषण करून अंतिमत: आपल्याला उद्देशांचे देखील विश्लेषण देखील
करावायचे आहे. त्यामध्ये प्रश्न, हेतू,
तक्ता, आकृती आणि अनुमान असे स्वरूप असणे गरजेचे आहे.
प्रश्न : आपल्या भागात नियमित पाणी येते का?
हेतू: धनकवडी
भागातील पाण्याच्या समस्या समस्या जाणून घेण्यासाठी वरील प्रश्न विचारला गेला आहे.
किती व्यक्ती नियमित पाण्याचा लाभ घेतात, व किती व्यक्ती पाण्याचा लाभ घेत नाहीत,
हे जाणून घेण्यासाठी सदर प्रश्न विचारला गेला आहे.
|
प्रश्न |
हो |
नाही |
एकूण |
|
आपल्या भागात नियमित पाणी येते का? |
३५ |
१५ |
५० |
|
% |
७० |
३० |
१०० |
तक्ता क्र. १ नियमित पाणी (संशोधनावर आधारभूत आकडेवारी)
आकृती क्र. १ नियमित पाणी (संशोधनावर आधारभूत आकडेवारी)
विश्लेषण :
वरील
आकृती क्र. १ वरून असे दिसून येते की बहुतांशी म्हणजेच एकंदरीत ७०% लोक यांच्याकडे
नियमित पाणी येते. उर्वरित लोकांच्या पाण्याच्या समस्या जाणवून येतात.
वरील
पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करून अंतिमत: विद्यार्थ्याने संपूर्ण
विश्लेषण करावयाचे आहे.
१.२.७ निष्कर्ष आणि
उपाययोजना
सर्वेक्षण
पूर्ण झाल्यावर सर्वेक्षणातून आपण काय काय शिकलो, काय माहिती प्राप्त केली हे
निष्कर्ष काढल्यावर सांगणे सोप्पे जाते. याच सोबत आपल्याकडून काही उपाययोजना
केल्या जाऊ शकतात, किंवा अगदी सांगितल्या जाऊ शकतात. उपाययोजना सांगणे दे देखील
तितकेच महत्वाचे असते.
१.२.८ परिशिष्ट
परिशिष्ट
म्हणजे आपण जे जे काम केले आहे त्याला सोबत म्हणून काही तपशील जोडणे. या
तपशिलावरून आपल्याला मुख्य गोष्टीपर्यंत पोहोचणे सोप्पे जाते.
सामाजिक
सर्वेक्षणामध्ये परिशिष्ट अ म्हणून आपल्याला आपण जे प्रश्न विचारले आहेत ते
त्यांचा एक नमुना जोडता येईल.
परिशिष्ट ब म्हणून
आपल्याकडे सर्वेक्षणाची जी कागदपत्रे आहेत, ती आपण वापरू शकतो.
परिशिष्ट क म्हणून आपण
सर्वेक्षण करताना ज्या व्यक्तींसोबत फोटो काढले त्या व्यक्तीचे फोटो - कोलेज आपण
याठिकाणी वापरू शकतो.
§§§
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete